Top News

जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलाची कुऱ्हाडीचे वार करीत हत्या #chandrapur

वाशिम:- जन्मदात्या पित्याने जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात आरोपीची पत्नी व १० वर्षाचा दुसरा मुलगा देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाशिम मध्ये खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ७ तारखेला मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील इचुरी गावात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नंदू आत्माराम घोडके हा व्यसनी होता. त्यामुळे त्याचे वृद्ध वडील आत्माराम घोडके यांनी जमीन त्याच्या नावावर न करता आपल्या दोन नातवांच्या नावावर केली होती. आत्माराम यांनी आरोपी नंदूचा मुलगा हरिओम घोडके व दुसरा वारसदार म्हणून मुलीच्या मुलाच्या नावे जमीन नोंदवली होती. यावरून नंदू घोडके हा दारू पिऊन वडील, पत्नी व मुलाशी नेहमी वाद घालायचा. ६ तारखेला संध्याकाळी असाच वाद झाला. त्यानंतर नंदूने रात्री साडेबारा वाजता पुन्हा वाद घालत पत्नी रेखा घोडके, मुलगा हरिओम घोडके, लहान मुलगा महादेव घोडके यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले.

दरम्यान, आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले, त्यांना पाहून नंदूने तिथून पळ काढला. शेजाऱ्यांनी तात्काळ तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मोठा मुलगा हरिओम घोडके याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अकोला येथे दुसरे हॉस्पिटल रेफर करण्यात आले होते. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर १0 वर्षाचा दुसरा मुलगा महादेवच्या डोक्याला मार लागला आहे. तो प्रचंड घाबरलेला आहे. आसेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने