गडचिरोली:- नादुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील देवळी गावाजवळ काल रात्री हा अपघात घडला. प्रशांत सरकार (३०) आणि बादल मलिक (३४) अशी मृत तरुणांची नावे असून दोघेही चामोर्शी तालुक्यातील श्रीनिवासपूर येथील रहिवासी होते. ()
सोमवारी (दि. ५) रात्री प्रशांत आणि बादल हे मोटारसायकलने चामोर्शीवरून गडचिरोलीकडे जात होते. दरम्यान देवळी गावाजवळ पोहचताच त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला धडक दिली. यात दोघेही जागीच ठार झाले. चामोर्शीचे पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.