वनकर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत भावाचा मृत्यू! #Chandrapur #Gadchiroli

Bhairav Diwase
0

मृतकाच्या भाऊ, बहिणीचा पत्रकार परिषदेतून आरोप

गडचिरोली:- आमचा भाऊ मित्रांसोबत जंगलात फिरायला गेला होता. वनकर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.परंतु प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.

त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषी वनकर्मचाऱ्यांना शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृतक रेड्डी बुचय्या जाडी (रा. सुर्यापल्ली ता. सिरोंचा) याचा भाऊ चिन्नालचन्ना बुचय्या जाडी आणि बहीण दुर्गु जिमडे यांनी गडचिरोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देतांना चिन्नालचन्ना जाडी याने सांगितले की, २४ जून रोजी रात्रीच्या सुमारास भाऊ रेड्डी बुचय्या जाडी गावातील मित्रांसोबत जंगलात गेला होता. दरम्यान गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. पहाटेच्या सुमारास जखमी अवस्थेत घरी आलेल्या भावाला विचारणा केली असता त्याने वनकर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचे सांगितले.

दरम्यान, तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी स्थानिक पोलीस पाटील,पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पोलीस ठाण्यात नेले व तक्रार दिल्यास तुम्हीच कारागृहात जाणार, अशी भीती दाखवली. या भीतीपोटी आम्ही कोणतीही तक्रार दिली नाही. त्यामुळे याप्रकरणाची खोलवर चौकशी करून दोषींना अटक करण्यात यावी अशी मागणी मृतक तरुणाच्या भाऊ आणि बहिणीने केली आहे.

पत्रपरिषदेला सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार, यशवंत त्रिकांडे, अरुण शेडमाके, ईश्वर गावडे, साईकिरण गड्डम, गौरव उलपूलवार आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)