शेतीच्या कुंपणाला विद्युत तारा जोडल्यास गुन्हा दाखल करणार:- पोलीस अधीक्षक #chandrapur


चंद्रपूर:- वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळण्याकरीता शेतातील वॉल कंपाऊडला जिवंत विद्युत तारा प्रवाहीत केल्यामुळे नाहक जीव गमवावा लागतो.

पंधरवाड्यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात एकाच दिवशी दोघांचा विद्युत धक्का लागून मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना घडल्यानंतर पोलीस अलर्ट झाले आहेत. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी शेतकऱ्यांना शेतातील कंपाऊडवर जिवंत विद्युत तारा सोडू नये, असे आवाहन केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात घनदाट अरण्यात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. वन्यप्राणी शेतपिकांचे नासधूस करतात. जंगली प्राण्यांपासून शेतमालाचे संरक्षण करण्यासाठी शेत कुंपणास अवैधरित्या विद्युत तारेची जोडणी केली जाते. विद्युत प्रवाह सोडल्यामुळे अनेक शेतकरी, गुराखी आणि प्रसंगी स्वतः शेत मालकास विद्युत शॉक लागून नाहक जीव गमवावा लागला आहे.

जिल्हयात 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत वर्षभरात 13 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे कृत्य करू नये. विद्युत तारा प्रवाहीत केल्यामुळे शेतकरी, गुराखी आणि शेत मालकांचे जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुंपणाला विद्युत तारा जोडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

असा प्रकार पुन्हा केल्यास आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आतापर्यंत 12 गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा होवू शकते. अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत