बनावट स्वाक्षरी प्रकरणी मुख्याध्यापक 'डॉ. अनिल मुसळे'सह एका शिक्षिकेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

Bhairav Diwase
0
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना 
कोरपना:- शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी आणि बनावट मान्यता पत्र तयार करून 2 साहाय्यक शिक्षिकांचे वेतन काढून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी कोरपना तालुक्यातील नांदा येथील 'प्रभू रामचंद्र शाळे'चे मुख्याध्यापक तथा एका बहुउद्देशीय संस्थे'चे सचिव 'डॉ.अनिल मुसळे' आणि सहाय्यक शिक्षिका 'योगीता शेडमाके,' या दोघांविरोधात 3 आक्टोंबर रोजी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे कोरपना पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी सचिन मालवी,यांच्या तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात सविस्तर असे की, शिक्षणाधिकारी  यांची बनावट स्वाक्षरी आणि बनावट मान्यता पत्र तयार करून 2 साहाय्यक शिक्षिकांचे वेतन काढून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी कोरपना तालुक्यातील नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालयाच्या मुख्याध्यापकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते.या विद्यालयात 2 साहाय्यक शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आली होती. विशेष म्हणजे,जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून नियुक्तीला मान्यता घेणे आवश्यक असताना मान्यता न घेता शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून मान्यता पत्र तयार करण्यात आले.काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून शालार्थ आयडी सुद्धा प्राप्त करून घेतली.बनावट मान्यतापत्राच्या आधारावर दोन शिक्षिकांचे वेतन काढून शासन आणि प्रशासनाची दिशाभूल केल्याची तक्रार शिक्षण उपसंचालक (नागपूर)यांच्याकडे करण्यात आली होती.या तक्रारीच्या आधारे चौकशी समिती गठित करून चौकशी करण्यात आली.चौकशीत शाळा व्यवस्थापनाने बनावट मान्यता पत्र तयार करून वेतन उचल केल्याची बाब चौकशीत स्पष्ट झाली.शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षिकांची मान्यता रद्द करून वेतनाची वसुली करण्याचे आदेश देतानाच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जि.प. च्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना 9 महिन्यांपूर्वीच देण्यात आले होते.परंतु,9 महिन्यांचा कालावधी लोटूनही संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले नाही. 

यानंतर परत शिक्षण उपसंचालकांचे याकडे लक्ष वेधण्यात आले.यानंतर 15 दिवसांपूर्वी गटशिक्षणाधिकारी यांना संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी दिले.या प्रकरणी चव्हाण यांनी पोलीस तक्रार दाखल करण्याचे आदेश कोरपना पं.स. गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याने त्यांच्या तक्रारीवरून डॉ.अनिल मुसळे व सहाय्यक शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाला असून सदर प्रकरण लक्षात घेता जिल्ह्यात बनावट पत्र तयार करून शिक्षक भरतीचे रॅकेट सक्रिय असल्याची शंका व्यक्त होता आहे.शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत सुद्धा काही सुज्ज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.सदर प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली असून राज्यात काही ठिकाणी शिक्षण विभागात विविध प्रकारच्या अनपेक्षित घटना घडत असतानाच आता चंद्रपूर जिल्ह्यातील नांदा येथे शासन फसवणुकीचा हा नवीन प्रकर समोर आला आहे.शिक्षण विभागात नेमकं चाललं तरी काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.सध्या डॉ.अनिल मुसळेसह शिक्षिका 'नॉट रिचेबल 'असून कदाचित यांची 'अटकपूर्व जामिना' (बेल)साठी धावपळ सुरू असेल ? अशी चर्चा ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.दरम्यान गडचांदूर पोलिसांचा तपास सुरू असून आरोपी फरार असल्याचे कळते.पोलिसांनी यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)