Top News

आक्षेपार्ह पोस्टला लाईक व कमेंट करणे भोवले; एकाला अटक #chandrapur #bhadrawati #arrested


भद्रावती:- पुण्याच्या बंद असलेल्या फेसबुकवरील एका अकाउंटला ॲक्टिव्ह करून त्यावरील श्रीराम, सीतामाता तथा हनुमानाबद्दल व्हायरल करण्यात आलेल्या अश्लील व आक्षेपार्ह पोस्टला लाइक व कमेंट करणाऱ्यावर भद्रावती येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. प्रकाश महादेव रामटेके (५४) रा. भद्रावती असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.


फेसबुकवर असलेल्या पुण्याच्या एका अकाउंटचा प्रकाश रामटेके हा सदस्य आहे. या अकाउंटवर श्रीराम, सीतामाता व हनुमानाबद्दल आक्षेपार्ह व अश्लील पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. या पोस्टला प्रकाशने लाइक करून कमेंट केली. या पोस्ट सर्वत्र फॉरवर्ड झाल्या. त्यावर अन्य काही व्यक्तींनीसुद्धा कमेंट्स केल्या.


यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या, अशी तक्रार भाजपचे शहर महामंत्री प्रशांत डाखरे यांनी भद्रावती पोलिसांत केली. त्यानुसार भद्रावती पोलिसांनी प्रकाश महादेव रामटेके याच्यावर संबंधित गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ माजली होती.


निषेधार्थ भद्रावतीत कडकडीत बंद

हिंदू देवदेवतांच्या या आक्षेपार्ह पोस्टमुळे भावना दुखावलेल्या शहरातील समस्त हिंदू बांधवांनी एकत्र येत रविवार दि. २८ रोजी संपूर्ण शहर बंदचे आव्हान करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण भद्रावती शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील बाजारपेठा पूर्णतः बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, शहरातील सर्वपक्षीय हिंदू बांधवांनी व नागरिकांनी एकत्र येत शहरात निषेध मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला. तसेच या गैरकृत्यामध्ये प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने