Top News

वीट मारल्याचा बदला खुनाने, तणसाच्या ढिगात जाळला मृतदेह #chandrapur #gadchiroliगडचिरोली:- वीटभट्टीवर काम करणाऱ्या दोन मजुरांत दारु पिल्यानंतर वाद झाला. एका मजुराने दुसऱ्याच्या डोक्यात वीट मारली, त्याचा राग अनावर झाल्याने वीट मारल्याचा बदला कुऱ्हाडीने हल्ला चढवून घेतला.


मजुराचा खून केल्यानंतर तणसाच्या ढिगावर मृतदेह ठेऊन तो जाळला. ६ जानेवारीला धानाेरा तालुक्यातील खेडी गावाच्या शिवारात हा थरार घडला. पोलिसांनी २४ तासांत या घटनेचा उलगडा करुन आरोपीला जेरबंद केले. विशेष म्हणजे, मयत व आरोपी दोघेही एकाच गावचे असून वय पासष्टीपार आहे.मनोहर नत्तू आत्राम (६७, रा. कन्हाळगाव) असे मृताचे नाव आहे. जयदेव कोलू हलामी (६५, रा.कन्हाळगाव) हा आरोपी आहे. कन्हाळगावजवळील खेडी येथे नाजूकराव ताडाम (रा. रांगीटोला) यांची वीटभट्टी आहे. तेथे मनोहर आत्राम व जयदेव हालामी हे विटा बनविण्याचे काम करत. अनेकदा ते वीटभट्टीच्या ठिकाणीच मंडपात मुक्काम करत. ६ जानेवारीला दिवसभर काम केल्यावर दोघेही तेथेच मुक्कामी राहिले. दोघांनीही रात्री सोबतच जेवण बनवले. थंडीमुळे जवळच शेकोटीही पेटवली होती. जेवणाचा आस्वाद घेत त्यांनी सोबत मद्यपानही केले. मात्र, याचवेळी विटा बनविण्याच्या कामावरुन त्यांच्यात वाद झाला. शाब्दिक चकमकीचे पर्यवसान हाणामारीत झाले. मयत मनोहर यांनी रागाच्या भरात जवळची वीट उचलून जयदेवच्या डोक्यात मारली. जयदेवच्या डोक्यात इजा झाली. यांनतर त्याचाही राग अनावर झाला.संतापाच्या भरात जवळ पडलेली कुऱ्हाड उचलून त्याने मनोहर आत्राम यांच्यावर निर्दयीपणे वार केले. डोक्यात वर्मी घाव बसल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर जयदेव हलामी भानावर आला. त्याने स्वत:चा बचाव करण्यासाठी मंडपातील तणसाच्या ढिगावर मनोहर आत्राम यांचा मृतदेह ठेऊन शेकोटीतील आगीने संपूर्ण मंडप पेटवून दिला. यात मनोहर यांच्या शरीराचा कोळसा झाला. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली. उपअधीक्षक साहिल झरकर, धानोरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी घटनास्थळी भेट दिली.


..अन् संशयाची सूई जयदेवच्या दिशेने


घटनेच्या आधी मनोहर हे शेवटी जयदेव हलामीसोबत असल्याची माहिती मिळाली अन् पोलिसांनी तपासाची दिशा त्याच्या दिशेने वळवली. जयदेवला घरातून ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने थरारपट उलगडला. मयत मनोहर आत्राम यांची पत्नी शशिकला आत्राम यांच्या फिर्यादीवरुन जयदेव हलामीविरुध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक सुमित चेवले, हवालदार रामगोपाल खवास, सुधाकर पुराम, संतोष मलगाम, पो.ना. लक्ष्मीकांत काटेंगे, गीतेश्वर बोरकुटे, पो.शि. मंगेश राऊत, पंकज भांडेकर यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने