शहर युवक काँग्रेसचा पत्रपरिषदेत दावा
चंद्रपूर:- काँग्रेस कधीही जातीचे राजकारण करत नाही. मात्र काहींनी आमदार प्रतिभा धानोरकर यांना तिकिटाची मागणी करून जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये काही काँग्रेस कार्यकर्त्यांचाच समावेश आहे. यास प्रतिबंध करून कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व आमदार विजय वडेट्टीवार यांचे समर्थक राजेश अडूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात कधीही जातीपातीचे राजकारण झाले नाही. अल्पसंख्याक समाजातील अनेक उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आल्याचा इतिहास आहे. भाजपच्या तिकिटावर चारदा निवडून आलेले हंसराज अहीर हे देखील अल्पसंख्येने असलेल्या समाजातून निवडून आले होते. मात्र आता काही लोक जातीयवादी घोषणा देत तिकिटांची मागणी करत आहेत आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा इशारा देत आहेत. विदर्भात विजय वडेट्टीवार यांच्यासारखा ओबीसी नेता नसता तर काँग्रेसची अवस्था बिकट झाली असती, असेही अडूर यावेळी म्हणाले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी शिवाराव, रुचित दवे, सचिन कात्याल, कुणाल गाडगे, रमीज शेख, संदीप सिडाम, भानेश जंगम, सूरज कन्नूर, राजेश नक्कवार, प्रवीण वडलुरी, पवन नगरकर उपस्थित होते.