आज येणार तीव्र उष्णतेची लाट!
चंद्रपूर:- हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज दि.5 एप्रिल रोजी चंद्रपूर शहरात दिवसा तसेच रात्रीही उष्णतेची लाट राहणार असुन याबाबत यलो अलर्ट देण्यात आला आहे. यंदा एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच प्रचंड उकाडा जाणवू लागला असुन सर्वांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यास सतर्क राहण्याचा इशारा चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येत आहे.
Also Read:- चंद्रपूर: तीव्र उन्हात काय करावे व काय करू नये
तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात मनपा आरोग्य विभागामार्फत उष्माघात कृती आराखडा राबविण्यात येत असुन उष्माघाताचा धोका टाळण्यास विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
तीव्र उन्हात नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे, घर थंड राहण्यास नागरीकांनी कुल रूफ टेक्नोलॉजीचा वापर करावा म्हणजेच उष्णतारोधक रंग जर घराच्या छतावर लावले तर 2 ते 3 डिग्री तापमान कमी होण्यास मदत मिळते. उष्माघातामुळे निर्माण होणाऱ्या आपातकालीन परिस्थितीप्रसंगी रुग्णवाहिकेला बोलाविण्यास 108 क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ट्रॅफीक सिग्नलवर नागरीकांना अधिक काळ उभे राहावे लागू नये याकरीता 12 ते 3 या कालावधीत ट्रॅफीक सिग्नल बंद ठेवण्याच्या सूचना वाहतूक विभागाला देण्यात आल्या आहेत. मनपा क्षेत्रातील उद्याने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येऊन नागरिकांना सावलीचा आश्रय मिळेल याची व्यवस्था करण्यात येत आहे.तसेच उष्माघाताचा धोका टाळण्यास नागरीकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ' शीत वार्ड ' ची व्यवस्था करण्यात आली आहे.