बल्लारपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी अपक्ष उमेदवारीचे नामांकन अर्ज दाखल करून बंडाची मशाल पेटवली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची चिंता वाढली आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला होता. मात्र काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची सिट सोडण्यास तयार नव्हती. त्यामुळे बरेच दिवस तिकिटाचा तिढा कायम होता. शिवसेनेकडून बल्लारपूर मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याचा आग्रह होता. आणि संदिप गिऱ्हे यांना उमेदवारी द्यावी यासाठी शेवटपर्यंत नेत्यांच्या वाटाघाटी सुरू होत्या. परंतु शिवसेनेला यात यश आले नाही. मात्र शिवसैनिक व जनतेच्या आग्रहाखातर संदिप गिऱ्हे यांनी २९ तारखेला आपला उपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली आहे.
विशेष म्हणजे अर्ज दाखल करताना बल्लारपूर मतदारसंघाचे शिवसेनेचे नगरसेवक, सरपंच, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत होते. हे बघता बल्लारपूरमध्ये शिवसनेने काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांच्या विरोधात अधिकृत बंड पुकारल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये ज्या वाटाघाटी सुरू होत्या, त्यावरून संदिप गिऱ्हे ओबीसी युवा चेहरा असल्याने मतदारसंघात मिळणारी पसंती यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात होती. स्वतः गिऱ्हे हे सुद्धा आशेवर होते. शिवसेनेमध्ये शेवटपर्यंत काहीही होऊ शकते असे त्यांचे म्हणणे होते. संदिप गिऱ्हे हे शिवसेना जिल्हाप्रमुख होते व बल्लारपूर विधानसभेत त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र रावत यांनी नामांकन अर्ज दाखल करताना शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दूर ठेवले, निरोप दिला नसल्याने शिवसैनिकांमध्ये आक्रोश निर्माण झाले होत. अश्या घडणाऱ्या गोष्टींचा निषेध करीत "जय भवानी, जय शिवाजी" म्हणत संदिप गिऱ्हे यांनी अपक्ष उमेदवारीचे नामांकन अर्ज दाखल करीत बंडखोरी केली आहे.