Sanjivreddy Bodkurwar: दोन कार्यकर्त्यांच्या वादाला राजकीय रंग; 'त्या' पोर्टलवर गुन्हा दाखल करणार

Bhairav Diwase
वणी:- वणी येथे भाजपाच्या दोन कार्यकर्त्याच्या अंतर्गत वादाचे वृत्त देतांना, बनावट स्टोरी तयार करून, या वादाला जातीयवादाचा रंग देवून, भारतीय जनता पार्टीला एका विशिष्ट समाजाचे विरोधात उभे करण्याचा फेक नॅरेटिव्ह पसरविण्यांचा कॉंग्रेसचा प्रयत्न उघड झाला आहे. हे खोडसाळ वृत्त प्रकाशीत करणाऱ्या न्यूज पोर्टल चॅनल चालकांवर मानहानीचा दावा करण्यात येणार असल्यांचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पत्रकार परिषदेत आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, रवि बेलुरकर, संतोष डंभारे यांच्यासह कुणबी समाजाचे भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


दि. 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी भाजपा कार्यालयात दोन कार्यकर्त्यात वैयक्तीक कारणावरून वाद झाला. हा वाद वाढत असतांना भाजपाचे कार्यकर्ते तारेंद्र बोर्डे हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले व त्यांनी हा वाद सोडविला. मात्र दुसरे दिवशी एका स्थानिक पोर्टलवर कुणबी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची बातमी प्रकाशीत झाली. त्यामुळे समाजबांधवाच्या भावना दुखावल्या. मात्र सदर वृत्त हे खोटे व खोडसाळ आहे. वैयक्तीक वादाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. पक्षात अनेक कुणबी पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. त्यांच्या एकजुटीने भाजपाच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे आमदार बोदकुरवार यांनी सांगीतले. उल्लेखनीय म्हणजे चंद्रपूर जिल्हयात सहापैकी तीन मतदार संघात, वरोरा, राजुरा, ब्रम्हपुरी येथे उमेदवार एकट्या कुणबी समाजाला देवून भाजपाने या समाजाला न्याय दिल्याचे बोलले जाते.