परभणी:- परभणी शहरातील प्राध्यापक कॉलनी येथे राहणाऱ्या अर्चना उत्तम कराळे (२१) या युतीने घरामध्ये गळफास घेऊन स्वत:चं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. रविवारी २२ डिसेंबर दुपारच्या सुमारास आईवडील घरी नसताना तिने टोकाचं पाऊल उचललं.
अर्चना ही परभणी तालुक्यातील हट्टा येथे औषधनिर्माण शास्त्र विद्यालयात शिक्षण घेत होती. ती शहरातील प्राध्यापक कॉलनी येथे आई-वडिलांसोबत राहत होती. अभ्यासाच्या ताणतणावामुळे आई वडील शेतात गेल्यानंतर तीने घरात लावलेल्या आडव्या लोखंडी पाईपला साडी बांधून गळफास घेतला. यामध्ये तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राम गीते व पोलिस जमादार मारुती माहूरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा केला असता घटनास्थळी चिट्टी आढळून आली. यामध्ये मयत युवतीने गळफास घेण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती.
या चिट्ठीत माझ्या मृत्यूला कोणालाही दोषी धरू नका. मिस यु आई पप्पा असा उल्लेख तिने केला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व रुग्णवाहिकेतून मयत युवतीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
दरम्यान, कराळे यांच्या माहितीवरून गंगाखेड पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.