CRPF : सीआरपीएफ जवानाने संपवले जीवन

Bhairav Diwase

गडचिरोली:- जिल्ह्यातील धानोरा येथील केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने २४ फेब्रुवारीला सकाळी डाेक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. गिरीराज रामनरेश किशोर (३०) असे मृत जवानाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीराज किशोर हे मूळचे उत्तरप्रदेश राज्यातील आग्रा येथील मूळ रहिवासी असून केंद्रीय राखीव दलाच्या ११३ बटालियनमध्ये कार्यरत होते.ऑक्टोबर २०२४ पासून ते धानोरा येथील पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होते. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. धानाेरा पोलिसांनी या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना कळविली आहे.

तीन दिवसांपूर्वीच ते सुटीवरुन कर्तव्यावर परतले होते. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांनी स्वत:कडील रायफलमधून कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेनंतर पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी आत्महत्या केली की चुकून गोळी लागली, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.