Suicide News: कृषी सहायकाने कार्यालयातच संपवले जीवन

Bhairav Diwase

छत्रपती संभाजीनगर:- सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गुरुवारी सकाळी ८.३० वाजता एका कृषी सहायकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. योगेश सोनवणे ( ३५, रा सिल्लोड) असे मृत कृषी सहायकाचे नाव आहे.

सोनवणे हे गेल्या तीन वर्षांपासून तालुका कृषी कार्यालयात लेखा विभागात ऑनलाइनची कामे करत होते. कार्यालय १० वाजता सुरू होते. मात्र कधी काम जास्त असले की ते ऑफिसला लवकर येत असत. गुरुवारी सकाळी ८ वाजता शिपायकडून त्यांनी कार्यालयाची चावी घेतली. सकाळी ८:१५ वाजता ते ऑफिसला आले. त्यानंतर त्यांनी ऑफिस मधील एका खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी १० वाजता ऑफिसमध्ये सर्व कर्मचारी आले असता त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी लागलीच सिल्लोड शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सोनवणे यांचा मृतदेह सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.

दरम्यान, याप्रकरणी मयत कृषी सहाय्यक योगेश सोनवणे यांच्या पत्नी विमल सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन सिल्लोड तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर श्यामलाल बरदे व कार्यालयातील कृषी सहाय्यक किशोर उत्तमराव बोराडे या दोघाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी.आर. कायंदे करीत आहेत.

सोनवणे मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या डोक्यावर खाजगी सावकाराचे मोठे कर्ज असल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यांच्याजवळ कोणतीही सुसाइड नोट आढळून आली नाही, यामुळे आत्महत्या कोणत्या कारणाने केली यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.

आमचा यात काही दोष नाही
सदर कर्मचारी खूप प्रामाणिक होता. आमचा त्याचा काही वाद नव्हता किंवा आम्ही त्याला त्रास दिला नाही. तरी त्याने असे का केले हे सांगता येत नाही. पण तो कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी. या गुन्ह्यात आम्हाला विनाकारण गोवण्यात आले आहे.
ज्ञानेश्वर बरदे तालुका कृषी अधिकारी सिल्लोड.