अहमदाबाद:- अहमदाबादमधून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. या विमानात नागपुरातील कामदार कुटुंबातील यशा कामदार, तिचा दीड वर्षाचा मुलगा रुद्र आणि सासू रक्षा मोढा यांचा मृत्यू झाला.
घटनेच्या काही दिवसांपूर्वीच यशा नागपुरात माहेरी आली होती. यशा कामदार यांचे वडील मनीष कामदार हे नागपुरातील क्वेटा कॉलनी परिसरातील हिंदुस्तान शाळेजवळ राहतात. यशा यांचा अहमदाबाद येथील मोढा कुटुंबात पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता.
काही वर्षांपूर्वी त्यांचे संपूर्ण कुटुंब लंडनला स्थायिक झाले. सासऱ्यांचे चार महिन्यांपूर्वी येथे अहमदाबाद येथे निधन झाल्याने यशा कुटुंबासह भारतात आली होती. त्यावेळी ती नागपूरला माहेरीही आली होती.
आता पुन्हा लंडनला जाण्यासाठी मुलगा व सासूसह एअर इंडियाच्या विमानाने यशा आज निघाली होती. काही कामांमुळे तिचा पती अहमदाबादेतच थांबला होता. पण विमानाने उड्डाण केल्यानंतर काहीच क्षणात अपघात झाला आणि यशा, रुद्र आणि रक्षा यांचा मृत्यू झाला.