Death News: खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
शनिवार, जुलै १२, २०२५
नागपूर:- नागपूर तहसीलमधील लावा शिवार (Lava Shivar) भागात गुरुवारी दुपारी दोन किशोरांनी जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना घडली. पाण्याने भरलेल्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन १५ वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोकाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
वाडी म्हाडा कॉलनीच्या गणेशनगर भागातील पाच मित्र - गुलशन माहोरे (१७), सार्थक कुमकुमवार (१७), धीरज उर्फ छोटू नारनवारे (१५), नैतिक वानखेडे (१५) आणि रुद्रसिंग (१५) - दुपारी बारा वाजता लावा शिवारातील एका जुन्या खाणीत पोहायला गेले. यामध्ये तीन जण किनाऱ्यावर थांबले, तर धीरज आणि नैतिक पाण्यात उतरले.
पोहत असताना धीरजचा तोल जाऊन तो बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात नैतिकही खोल पाण्यात गेला. दोघेही काही क्षणांतच पाण्यात गडप झाले. जवळच असलेल्या एका व्यक्तीने धीरजला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोवर उशीर झाला होता.
घाबरलेले इतर मित्रांनी तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. दीडच्या सुमारास वाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. धीरजचा मृतदेह एका नागरिकाच्या मदतीने बाहेर काढण्यात आला व त्याला अमेरिकन ऑन्कोलॉजी रुग्णालयात नेण्यात आले. नैतिकचा मृतदेह खोल पाण्यात अडकलेला होता, जो फायरमन वैभव कोलस्कर यांनी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढला.
मुलाचा मृतदेह पाहताच नैतिकची आई हंबरडा फोडून कोसळली. मृतदेहांना शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले.