Click Here...👇👇👇

Fraud of unemployed youth: राजस्थानच्या कंपनीकडून विदर्भातील बेरोजगार तरुणांची फसवणूक

Bhairav Diwase

चंद्रपूर:- राजस्थानमधील 'ट्रेडस्टिक व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड' आणि नंतर 'डेली ग्रोथ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' या कंपन्यांनी चंद्रपूरसह विदर्भातील शेकडो बेरोजगार तरुणांची नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली आहे.



गेल्या दोन वर्षांपासून चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील मराठा चौकात 'ट्रेडस्टिक व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने तरुणांना नोकरीची आणि कपड्यांच्या मार्केटिंगमधून लाखोंची कमाई करण्याची स्वप्ने दाखवली. प्रत्येक तरुणाकडून ११ हजार ते ४६ हजार रुपये घेऊन त्यांना निकृष्ट दर्जाचे कपडे दिले जात होते आणि त्यांची मार्केटिंग करण्यास सांगितले जात होते.


दरम्यान, राजस्थानमधील या कंपनीच्या संचालकांनी गाशा गुंडाळल्यानंतर, काही परप्रांतीय लोकांनी स्थानिक तरुणांना हाताशी धरून त्याच ठिकाणी 'डेली ग्रोथ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' या नावाने नवीन कंपनी सुरू केली. त्यांनीही गरीब आणि बेरोजगार तरुणांची नोकरीच्या नावाखाली फसवणूक सुरूच ठेवली. वणी येथील तीन मुली आणि एका मुलाचीही या कंपनीने फसवणूक केल्याने त्यांनी मनसे कार्यालयात संपर्क साधून आपली व्यथा मांडली.


कंपनीने तरुणांना सांगितले होते की, जेवढे कपडे विकले जातील किंवा जेवढे लोक कंपनीशी जोडले जातील, तेवढे कमिशन मिळेल. मात्र, बाहेर जिल्ह्यातील गावातून आलेल्या तरुणांना चंद्रपूरमध्ये आधीच मोठी कापडाची दुकाने असल्याने, बाहेर प्रांतातून आलेल्या कंपनीचे कपडे कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार काम अर्ध्यातच सोडून आपापल्या गावी परतले. परंतु, त्यांचे प्रत्येकी ११ हजार ते ४६ हजार रुपये कंपनीने बुडवले आहेत.


या कंपन्यांमध्ये पैसे भरण्यासाठी काही तरुण-तरुणींनी आपल्या आई-वडिलांकडून पैसे घेतले. कुणी स्वतःचे मंगळसूत्र विकून, तर कुणी स्वतःची दुचाकी विकून मुलींसाठी पैसे दिले. आज ते सर्व पैसे कंपनीने बुडविल्यामुळे अनेक तरुण आत्महत्येच्या विचारात असल्याचे मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी सांगितले. मनसे कामगार सेनेच्या माध्यमातून या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी फसवणूक झालेले अनेक तरुण-तरुणी उपस्थित होते.