गोंडपिपरी:- शेतातील काम आटोपून बैलबंडीने घरी परतत असताना रानटी डुकरांच्या अचानक झालेल्या कळपामुळे बैल चवताळले आणि बैलबंडीवरील महिला खाली पडून गंभीर जखमी झाली. उपचारासाठी चंद्रपूर येथे नेले असता तिचा मृत्यू झाला. शालू कालिदास कोठारकर (वय ४६), रा. तोहोगाव, असे मृत महिलेचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास तोहोगाव शेतशिवार परिसरात घडली.
गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील सुनील देवराव भगत, कालिदास कोठारकर हे पत्नी शालूसह शेतातील कामे करून बैलबंडीने घरी परतत होते. दरम्यान, वाटेत अचानक रानटी डुकरांचा कडप समोर आला. त्यामुळे बैल घाबरून चवताळले आणि बैलबंडीवरील शालू कोठारकर खाली पडली. या घटनेत बैलबंडीचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने तोहोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढे चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.