गडचिरोली:- आजच्या युवक विद्यार्थ्यांनी जननी आणि जन्मभूमी यांचा विसर न होवू देता विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या सेवेसाठी व देश सेवेसाठी पुढाकार घेवून जीवन जगावे, असे प्रतिपादन युवा कीर्तनकार तथा समाजप्रबोधनकार हरिभक्त परायण सोपानदादा कनेरकर यांनी केले. कुरखेडा येथील श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष तथा आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संचालक व शाळा समिती कुरखेडा, कोरचीचे अध्यक्ष वामनराव फाये होते. यावेळी उद्घाटक म्हणून वनपरिक्षेत्राधिकारी एम. एन. गोपुलवार तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव दोषहरराव फाये, भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, प्राचार्य नागेश्वर फाये, प्राचार्य देवेंद्र फाये, शाळा संस्था सदस्य हुंडीराज फाये, गुणवंत फाये, मनिष फाये, प्रा. ठाकरे, संजय शिरपूरवार उपस्थित होते. पुढे बोलताना सोपानदादा कनेरकर यांनी युवक, युवती, विद्यार्थ्यांना विविध उदाहरणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व संस्कार या संदर्भात सखोल मार्गदर्शन करून भारताचा इतिहास पटवून सांगितला व आई-वडिलांचा व गुरुजनांचा मान खाली जाणार नाही असे कोणतेही वर्तन विद्यार्थ्यांनी करू नये, अशी सूचना सुद्धा त्यांनी केली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. विनोद नागपूरकर यांनी केले. प्रास्ताविक भाजपा तालुकाध्यक्ष तथा शाळा समिती सदस्य चांगदेव फाये यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. प्रदीप पाटणकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले.