चंद्रपूर:- अत्यंत प्रदूषित चंद्रपूर शहरात, हिरवळीने नटलेल्या रामबाग मैदानाशेजारील सुमारे शंभर वृक्षांची युद्ध पातळीवर कटाई करून सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे काम सुरू केल्याने, चंद्रपूर शहरातील नागरिक पुन्हा एकदा संतप्त झाले आहेत.
रामबाग मैदानाशेजारी असलेल्या परिसरातील सुमारे शंभर झाडे, ज्यात ताड, सिंधी आणि चाळीस-पन्नास वर्षांपेक्षा जुनी सागवानची झाडे होती, ती कापण्यात आली आहेत. या वृक्षतोडीमुळे चंद्रपूरच्या नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. चंद्रपूर शहर आधीच प्रदूषणाच्या विळख्यात असताना, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे.
याच वृक्षतोडीच्या निषेधार्थ, आणि एक वेगळ्या पद्धतीने आपला विरोध दर्शवण्यासाठी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त, म्हणजेच २२ जुलैला नवीन जिल्हा परिषद इमारतीच्या प्रस्तावित जागेवर शंभर वृक्षांची लागवड करून आंदोलन करण्यात आले. रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे वृक्षारोपण आंदोलन पार पडले.