Click Here...👇👇👇

two groups fight : दोन गटात तूफान राडा; पूजा सुरु असताना झाला वाद

Bhairav Diwase

गडचिरोली:- गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल असा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील दुर्गम भागात गेल्या काही दिवसांपासून धर्मांतराचे प्रकार वाढू लागले आहेत. आदिवासी समुदायातील काही लोक धर्म बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारत असल्याचे समोर आले आहे. एकाच गावात दोन गट निर्माण झाल्यामुळे या गटांमधील लोकांमध्ये अनेकदा वाद निर्माण होतात. अहेरी तालुक्याच्या देचलीपेठा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दोडगेर गावात असाच एक प्रकार समोर आला आहे.


गावातील पूजेदरम्यान आदिवासी समुदाय आणि धर्मांतरित ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांमध्ये मोठा वाद झाला. हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी आदिवासी समाजातील 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला आदिवासी समाजातील लोकांकडून गावपूजा केली जाते. ही पूजा सलग तीन दिवस चालते. शुक्रवारी दोडगेर गावातही अशाच प्रकारची पूजा आयोजित करण्यात आली होती. गावात सुमारे 65 लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले असल्याने, आदिवासी लोकांनी या सर्व लोकांना पूजेदरम्यान 2 ते 3 दिवस गावात राहू नये, असे सांगितले. पण याला धर्मांतरण करणाऱ्या लोकांनी विरोध केला.


शुक्रवारी संध्याकाळी उशिरा पूजा सुरू असताना ते गावाच्या मुख्य चौकात पोहोचले. आदिवासी समाजातील लोकांशी वाद घालू लागले. हा वाद टोकाला पोहोचला. लोकांमध्ये हाणामारी झाली. काही वेळाने प्रकरण शांत झाल्यावर ख्रिश्चन समुदायाच्या लोकांनी या प्रकरणी देचलीपेठा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.


दोडगेर गावातील 11 आदिवासी लोकांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. या सर्व लोकांना शनिवारी (दि. 19) दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. सर्व आरोपींना जामिनावर सोडण्यात आले. आदिवासी समाजाच्या प्रथा अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहेत. आपला समाज सोडून दुसऱ्या समाजाला स्वीकारणाऱ्यांसाठी आमची परंपरा खंडित होणार नाही. धर्मांतर करणाऱ्या लोकांना आमच्या परंपरेबद्दल काही अडचण असेल, तर ते स्वतःहून गाव सोडू शकतात, असे दोडगेरचे सरपंच जयवंत मडावी यांनी सांगितले.