चंद्रपूर:- दिनांक ३० ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे श्री गणेश उत्सावाच्या पार्श्वभुमीवर एक महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी मा.श्री संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांनी भुषविले. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर यांच्या संकल्पनेने जिल्हयात एक Social Harmony (सामाजिक सलोखा) नावाने व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले असुन त्यात जिल्हयातील प्रतिष्ठीत जबाबदार नागरिकांना समाविष्ठ करण्यात आले असुन सदर गृप सदस्य, जिल्हा शांतता समिती सदस्यांसह इतर मान्यवर व प्रिन्ट ॲण्ड इलेक्ट्रानिक मिडीयाचे पत्रकारांसोबत चर्चा करण्याचे उद्देशाने सदर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
सदर बैठकीचा प्रमुख मुद्दा श्री गणेशोत्सव दरम्यान जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, धार्मिक श्रध्दा व उत्साहाला बाधा न आणता संपुर्ण उत्सव व विसर्जन मिरवणुकीत नागरिकांचा सहभाग सुरक्षित करणे आणि उत्सव उत्साहात व शांततेत पार पाडणे हा होता. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले की, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृत्यांना सहन केले जाणार नाही. नागरिकांची श्रध्दा आणि समाजातील शांतता या दोन्ही बाबी प्रशासनासाठी समान महत्वाच्या आहेत. त्याच प्रमाणे चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असुन जिल्हयाची ख्याती सर्वत्र चांगली असल्याने जिल्हयात नविन उद्योग धंदे मोठया प्रमाणावर येत आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्हयाची ओळख शांतताप्रिय जिल्हा म्हणुन नेहमी कायम ठेवण्याची जबाबदारी ही सर्व चंद्रपूरकर नागरीक आणि पत्रकारांची राहील. त्याच प्रमाणे बैठकीत उपस्थितांनी केलेल्या प्रश्न व दिलेल्या सुचनांचे अनुषंगाने उत्सवा दरम्यान कायद्याचे पालन न करणारे युवा पिढींना मार्गदर्शन करणे, एखादा गुन्हा नोंद झाल्यावर त्यांच्या भविष्यावर होणारे विपरीत परिणामाची माहिती देवुन त्यांना जबाबदारीने व श्रध्दापूर्वक उत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन देणेबाबत मार्गदर्शन केले. तसेच ध्वनी प्रदुषण कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाईल, मिरवणुकीतील धोकादायक लेझर लाईटींग यंत्र वापरणाऱ्यांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. श्री गणेश उत्सव हा श्रध्दा आणि आनंद आणि ऐक्याचा उत्सव असला तरी त्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेची कसोटी लागते. तरुणाईची गर्दी व मिरवणुकीत उन्माद करणारे घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला लोकसहभागाचा आधार अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांनी नागरीकांना आवाहन केले की, नागरिकांनी शांतता व शिस्त राखण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा. पोलीस यंत्रणा ही केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था नाही तर नागरीकांच्या सुरक्षेसाठी कार्य करणारा महत्वाचा घटक आहे. प्रत्येक नागरीकांनी कायद्याचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य केले तर कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. श्री गणेश उत्सवात भक्ती, श्रध्दा, आनंद आणि उत्साहासोबत जबाबदारीची जाणीव ठेवली तर चंद्रपूर जिल्हयाची शांतताप्रिय जिल्हा म्हणुन प्रचिती कायम राहुन शिस्तबध्दतेचा आदर्श निर्माण करु शकेल. चंद्रपूर जिल्हा पोलीस दल नेहमीच नागरीकांच्या सेवेसाठी व सुरक्षिततेसाठी तत्पर आहे.
सदर बैठकीत पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर श्री सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी, चिमूर श्री दिनकर ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी श्री राकेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा श्री संतोष बाकल, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदुर श्री रविंद्र जाधव यांचेसह जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयातील इतर शाखा प्रमुखासह जिल्हयातील नव्याने तयार करण्यात आलेल्या गृप सदस्य आणि जिल्हा शांतता समिती सदस्यांसह प्रिन्ट आणि इलेक्ट्रानिक्स मिडीयाचे पत्रकार व इतर मान्यवर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.