महिला उमेदवारांच्या निवाऱ्याची चिंता मिटली! जयदीप रोडे यांचा मदतीचा हात; राहणे आणि जेवण मोफत!
चंद्रपूर:- सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरतीचा फिव्हर पाहायला मिळतोय. आपल्या लाडक्या चंद्रपूर जिल्ह्यातही हजारो तरुणी डोळ्यांत खाकी वर्दीचं स्वप्न आणि उराशी जिद्द घेऊन दाखल झाले आहेत. पण, घरापासून दूर आलेल्या या महिला उमेदवारांसमोर मोठा प्रश्न होता - राहायचं कुठे आणि खायचं काय? याच प्रश्नाचं उत्तर बनून पुढे आले आहेत. जयदीप प्रकाशराव रोडे!
चंद्रपूरच्या पोलीस भरती मैदानात सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उमेदवार दाखल होत आहेत. कोणी ग्रामीण भागातून आलंय, तर कोणी परजिल्ह्यातून. मैदानी चाचणीसाठी पहाटे ४ वाजताच मैदानात हजर राहावं लागतं. अशावेळी शहरात महागड्या लॉजवर राहणं आणि हॉटेलचं जेवण करणं या सर्वसामान्य उमेदवारांच्या खिशाला परवडणारं नाही.
महिला उमेदवारांची हीच अडचण ओळखून जयदीप प्रकाशराव रोडे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आपल्या 'शिवगड' कार्यालयाचे दरवाजे या भावी महिला पोलिसांसाठी पूर्णपणे मोफत खुले केले आहेत. येथे केवळ राहण्याचीच सोय नाही, तर रात्रीच्या सकस जेवणाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून उमेदवारांनी फक्त आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करावं. तसेच महिला उमेदवारासोबत त्यांचे पालक व नातेवाईक यांची सुद्धा राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्थळ: शिवगड कार्यालय, एस.टी. वर्कशॉप चौक, पंचवटी लॉन जवळ, तुकूम, चंद्रपूर.
जयदीप रोडे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. राजकारणापलीकडे जाऊन समाजसेवेचा हा वारसा खऱ्या अर्थाने उमेदवारांना बळ देणारा ठरत आहे.


