Chandrapur News: क्रिकेट सट्ट्यावर चंद्रपूर एलसीबीचा 'सर्जिकल स्ट्राईक'

Bhairav Diwase
सुमठाणा चौकातून एकाला रंगेहाथ पकडले
भद्रावती:- टी-२० वर्ल्ड कपचे वारे वाहत असतानाच, या सामन्यांच्या नावाखाली चालणाऱ्या ऑनलाईन जुगारावर चंद्रपूर पोलिसांनी आता आपला मोर्चा वळवला आहे. भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या सट्टा अड्ड्यावर छापा टाकत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती येथील सुमठाणा चौक परिसरात वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे या टी-२० सामन्यावर ऑनलाईन जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी एलसीबीच्या पथकाने अचानक छापा टाकला.

या छाप्यात विलास शंकरराव पारखी (वय ४२, रा. खापरी) हा आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन सट्टा लावताना रंगेहाथ मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि जुगाराचे स्क्रीनशॉट्स असा एकूण १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपी विलास पारखी विरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४१३/२६, कलम १२(A) महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम ४९ (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी आकाश शाहू (रा. पंचशील वार्ड, भद्रावती) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि उपविभाग वरोरा पथकाद्वारे करण्यात आली. या कारवाईमुळे सट्टा बाजारात मोठी खळबळ माजली आहे.