गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या मार्कंडा देवस्थान येथे यात्रेनिमित्त भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. मात्र, याच गर्दीत एक मोठी दुर्घटना घडता घडता राहिली. नदीपात्रात स्नान करताना खोल पाण्यात वाहून जाणाऱ्या तीन तरुणांना आपदा मित्र, SDRF आणि पोलीस बचाव पथकाने मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले आहे.
२२ फेब्रुवारी रोजी घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील सुमित शेंडे, समीर शेंडे आणि आकाश शेंडे हे तिघे भाऊ नदीत स्नान करत असताना खोल पाण्यात अडकले. एकाच वेळी तिघेही बुडत असल्याचे पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, प्रसंगावधान राखत आपदा मित्र समीर शेंडे, अनिकेत खोब्रागडे, मनोज आत्राम यांच्यासह पोलीस पथकातील वासनिक आणि रुपेश यांनी संयुक्त मोहीम राबवून या तिघांनाही सुखरूप बाहेर काढले.
या धाडसी बचावकार्यामुळे सर्वत्र पोलीस आणि आपदा मित्रांचे कौतुक होत आहे. दरम्यान, प्रशासनाने भाविकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नदीपात्रात स्नान करताना खोल पाण्यात जाऊ नये आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.

