चंद्रपूर:- जिल्ह्यात गोवंश तस्करी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, आज पडोली पोलिसांनी ताडळी पुलाखाली सापळा रचून मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत कत्तलखान्याकडे निर्दयतेने नेली जाणारी ६ गोवंशीय जनावरे सोडवण्यात आली असून, दोन पिकअप वाहनांसह एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही इसम पिकअप वाहनांमधून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणार होते. या माहितीची दखल घेत एसडीपीओ (SDPO) प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) रोशन इरपाचे आणि पोलीस अंमलदार सचिन पोहनकर यांनी ताडळी पुलाखाली पंचासमक्ष सापळा रचला.
संशयास्पद रित्या येणाऱ्या दोन पिकअप गाड्यांना अडवून तपासणी केली असता, त्यात ६ जनावरे अमानुषपणे बांधून ठेवलेली आढळली. पोलिसांनी तात्काळ सर्व जनावरांची सुटका केली. या कारवाईत दोन वाहने आणि जनावरे असा एकूण ६,४०,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
सदरची यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कतकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन इरपाचे करीत आहेत.

