Murder News: भररस्त्यात नव्हे, तर शेतात रंगला मृत्यूचा थरार

Bhairav Diwase
अनैतिक संबंधाच्या संशयातून चुलत दिराने केला वहिनीचा गेम
पोंभूर्णा:- तालुक्यातील चेक खापरी येथे नातेसंबंधाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.चुलत दिरानेच आपल्या वहिनीचा गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली असून सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना प्रेमसंबंधाच्या संशयातून घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संजना थामदेव सोनटक्के वय (३२) रा. चेक खापरी असे मृत महिलेचे नाव आहे. तर धनराज यादव सोनटक्के वय (३६) रा. चेक खापरी असे आरोपीचे नाव आहे.


मृत महिलेचे पाच वर्षापासून चुलत दिर धनराज सोनटक्के याचेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र आरोपी दिराला आपल्या व्यतिरिक्त तिसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.आरोपीने रविवारी (दि.२२) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास मृतक संजनाला घराजवळच असलेल्या विकास पिद्दुरकर यांच्या शेतात बोलवून वाद घातला. व संतापाच्या भरात आरोपीने वहिनीचा गळा दाबून खून करून तो घटनास्थळावरून पसार झाला. सोमवारला (दि.२३)दुपारी तीन वाजताच्या सुमारास शेतमालकाला शेतात संजनाचा मृतदेह दिसल्याने घटना उघडकीस आली.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संबंधित आरोपीला सहा तासात जेरबंद केले. आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाचा पिसीआर दिला. पुढील तपास ठाणेदार राहुल ठेंगणे करीत आहेत.

प्रेमसंबंधात विश्वासघात झाल्याच्या संशयातून घडलेल्या या हत्येमुळे नातेसंबंधातील भीषण रूप पुन्हा एकदा समोर आले आहे.