खा. धानोरकर यांचे तरुणांना सतर्क राहण्याचे आवाहन!
चंद्रपूर:- सोशल मीडियावरील एका व्हायरल मेसेजमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांचा एक तक्ता सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे मनपात मोठी नोकरभरती सुरू असल्याचा चुकीचा संदेश पसरत आहे.
मात्र, सुशिक्षित तरुण आणि पालकांनी या अफवांना बळी पडू नये, असे जाहीर आवाहन चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला तो तक्ता म्हणजे कोणतीही नवीन नोकरभरतीची जाहिरात नसून, तो केवळ प्रशासकीय माहितीचा गोषवारा आहे. चंद्रपूर मनपा प्रशासनाने सद्यस्थितीत अशी कोणतीही भरती प्रक्रिया किंवा अर्ज मागवण्यास सुरुवात केलेली नाही, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तरुणांना आणि पालकांना सावध करताना म्हटले आहे की, काही गैरप्रवृत्तीचे लोक किंवा दलाल या रिक्त पदांच्या यादीचा गैरवापर करून नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने तरुणांची आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणत्याही नागरिकाने किंवा तरुणाने अशा खोट्या आमिषांना, आश्वासनांना आणि पैशांच्या मागणीला अजिबात बळी पडू नये.
जर नोकरीच्या नावावर कोणीही पैशांची देवाणघेवाण करत असल्यास किंवा फसवणुकीचा प्रयत्न केल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. केवळ अधिकृत शासकीय संकेतस्थळावर (Official Website) किंवा मुख्य वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींनाच खरे मानावे; कोणत्याही अनधिकृत व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये.
स्वतःची आर्थिक आणि मानसिक फसवणूक टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ही महत्त्वाची माहिती इतर गरजू मित्रांपर्यंत आणि सोशल मीडिया ग्रुप्सवर शेअर करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून कोणीही तरुण फसवणुकीचा बळी ठरणार नाही.


