Chandrapur News: मतिमंद महिलेवर अत्याचार; पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

Bhairav Diwase

चिमूर:- चिमूर तालुक्यातील एका गावात मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना दि.७ मे ला उघडकीस आली आहे. एका गावातील ३७ वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.


संबंधित महिला गतिमंद असून तिला बोलता येत नाही. तिचे आई-वडील दोघांचेही निधन झाले आहे. एक लहान भाऊ असून तो उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी राहतो. त्यामुळे या महिलेच्या देखभालीसाठी कोणीही नसल्याने ती गावातच भटकत होती. अनेकदा गावातील घरांमधून अन्न मागून ती जगत होती. तिच्या या असहाय्य अवस्थेचा फायदा घेत अज्ञात नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


गावातील आशा सेविका आणि काही महिलांना संबंधित महिलेच्या हालचालीत बदल जाणवला. तिचे पोटही पुढे आलेले दिसल्याने त्यांनी तत्काळ तिला शासकीय दवाखान्यात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत ती तब्बल पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब समोर येताच गावात एकच खळबळ उडाली.


घटनेची माहिती मिळताच तिच्या भावाने भिसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार नोंदवून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार मंगेश भोंगळे, पोलिस उपनिरीक्षक रवी वाघ, पोलिस हवालदार दुर्गेश नन्नावरे व घोडमारे करीत आहेत. अनाथ, असहाय आणि गतिमंद महिलेवर झालेला हा अत्याचार समाजमन सुन्न करणारा आहे. अशा नराधमाला तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी संतप्त मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.