Murder News: 'तू चिडचिड नको करुस' पुतण्याला सल्ला देणे पडले महागात; झोपेत असताना काकाला केले ठार

Bhairav Diwase

कोरची:- गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात नात्यांना काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शांत राहा, चिडचिड कमी करा असा प्रेमाचा सल्ला देणाऱ्या काकाचाच पुतण्याने निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना मुलेटीपदीकसा गावात उघडकीस आली आहे. आरोपी पुतण्याला पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे.


पुनाराम बैसाकू धुर्वे (वय 65) यांनी आपल्या पुतण्याला चांगल्या हेतूने दिलेला सल्लाच त्यांच्या जीवावर बेतला. रोजगारासाठी बंगळुरूहून गावी परतलेल्या रामनाथ धुर्वेने डोकेदुखीचा त्रास होत असल्याची माहिती काकांना दिली होती. त्यावर पुनाराम यांनी औषध घेण्यासोबतच स्वभावातील चिडचिड कमी करण्याचा आणि शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र, हाच सल्ला रामनाथच्या जिव्हारी लागला. तेव्हापासून तो काकांबद्दल द्वेष बाळगून होता.


दरम्यान, रात्रीच्या वेळी शेतातील झोपडीत झोपलेल्या काकांवर रामनाथने धारदार कुर्‍हाडीने हल्ला केला. मानेवर सपासप वार करत त्याने काकांचा जागीच मृत्यू झाला आणि घटनास्थळावरून फरार झाला. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कोरची पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत संशयित रामनाथला घरातून अटक केली. पोलिसांनी रक्ताने माखलेली कुर्‍हाडही जप्त केली.