वरोरा:- दारूचे व्यसन माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा प्रत्यय वरोरावासीयांना आला. एका मद्यधुंद मुलाने किरकोळ वादातून चक्क आपल्या राहत्या घरालाच आग लावून दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील गुरुदेव नगरी, मोहबाळा परिसरातील व्होल्टास कॉलनीमध्ये सायंकाळच्या सुमारास एकच खळबळ उडाली. येथील एका तरुणाने दारूच्या नशेत स्वतःच्या घराला आग लावली. आग लावल्यानंतर काही क्षणांतच ज्वाळांनी रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण घराला कचाट्यात घेतले.
या भीषण आगीत घरातील महागडे फर्निचर, सजावटीचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर संसारोपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आगीचे लोट पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु लाखो रुपयांचे नुकसान झाले असून एक कुटुंब उघड्यावर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वरोरा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. अरुंद रस्ते आणि आगीचे स्वरूप पाहता मोठी अडचण निर्माण झाली होती, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. जवानांच्या प्रसंगावधानामुळे ही आग शेजारील घरांपर्यंत पसरली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.


