Chandrapur News: 'ज्यांनी निवडून आणलं, त्यांच्याशीच बेइमानी का?"

Bhairav Diwase
काँग्रेसचे नेते डॉ. दिलीप कांबळे यांचा संतप्त सवाल
चंद्रपूर:- फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेचा पाईक, प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि बहुजन समता पर्वाचे मुख्य संयोजक डॉ. दिलीप कांबळे यांनी एका अत्यंत संतापजनक आणि विचार करायला लावणाऱ्या वास्तवावर थेट बोट ठेवले आहे.

माजी मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असलेले डॉ. कांबळे यांनी बौद्ध समाजात राजकीय नेतृत्व निर्माण व्हावे, यासाठी मोठा लढा दिला. काँग्रेस पक्षात आपली प्रतिष्ठा पणाला लावून, स्वतःचा पैसा खर्च करून त्यांनी महापालिका निवडणुकीत ५ जणांना उमेदवारी मिळवून दिली आणि त्यांना निवडूनही आणले. यामध्ये १ आदिवासी आणि ४ अनुसूचित जातीचे (SC) उमेदवार होते.

पण खरी वेदना तिथून पुढे सुरू होते. आदिवासी आणि इतर उमेदवार निवडणुकीनंतर आपापल्या भूमिकेवर तटस्थ राहिले, मात्र बौद्ध समाजातून निवडून आलेले तीनही उमेदवार संधीसाधू राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप डॉ. कांबळे यांनी केला आहे.

आज इकडून मिठाई आली की तिकडे जायचं, उद्या दुसरीकडून आली की पुन्हा तिकडे... हा नीचपणा फक्त बौद्ध उमेदवारच करत आहेत. ज्या माणसाने तिकीट दिलं, पैसे लावले, स्वतः खर्च करून निवडून आणलं, त्यांच्याशीच जर हा खेळ सुरू असेल, तर हे उद्या सामान्य जनतेचे कसे काय होणार?"

मी स्वतः या लोकांना तिकीट मिळवून दिलं, त्यामुळे या सगळ्या प्रकारात मीही कुठेतरी अप्रत्यक्षपणे सामील आहे का? असा आत्मपरीक्षणाचा प्रश्न मला पडला आहे," अशी प्रांजळ भावना डॉ. कांबळे यांनी व्यक्त केली आहे.

ज्या नेत्याने आपले राजकीय करिअर घडवले, त्याच्या पाठीत खंजीर खुपणाऱ्या अशा नगरसेवकांना आता जनतेनेच जाब विचारला पाहिजे, अशी आक्रमक साद डॉ. दिलीप कांबळे यांनी घातली आहे.