चंद्रपूर:- चंद्रपूरमधील बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावर असलेल्या नागभीड रेल्वे स्थानकावर अचानक एक अस्वल फलाटावर (Platform) धडकले.
सकाळची वेळ होती. सुदैवाने त्या वेळी स्थानकावर कोणतीही ट्रेन नव्हती आणि प्रवाशांचीही गर्दी नव्हती. त्यामुळे एक मोठा अनर्थ किंवा संभाव्य हानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, हे अस्वल काही वेळ रेल्वे फलाटावर राजरोसपणे फिरताना दिसले. त्यानंतर ते फलाटावरून खाली उतरले आणि रेल्वे रुळांच्या दिशेने जाऊ लागले.
अस्वलाने अत्यंत चलाखीने दोन रेल्वे क्रॉसिंग पार केल्या. मात्र, दुसऱ्या फलाटावर चढताना त्याला बरीच कसरत करावी लागली. बऱ्याच धडपडीनंतर ते अखेर दुसऱ्या बाजूला गेले आणि परिसरा तओझल झाले.
या घटनेची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली. परंतु, वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचण्याआधीच अस्वलाने तिथून काढता पाय घेतला होता. मात्र, सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, नागभीड रेल्वे स्थानकाला लागून कोणतेही मोठे घनदाट जंगल नसताना हे अस्वल आले कुठून?
परिसरातील एखाद्या जंगलक्षेत्रातून वाट भटकत हे वन्यजीव मानवी वस्तीपर्यंत पोहोचले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सध्या वन विभाग या अस्वलाचा नेमका मार्ग कोणता होता आणि ते कुठे गायब झाले, याचा कसून शोध घेत आहे.
सध्या चंद्रपूर परिसरातील रेल्वे मार्गांवर वन्यजीवांच्या अशा वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये आणि वनविभागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

