चिमूर:- बहिणीला दिलेल्या पाहुणचाराच्या मटणाच्या भाजीवरून उफाळलेला किरकोळ वाद एवढ्या टोकाला गेला की, मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावावर कुन्हाडीने सपासप वार करून त्याचा निघृण खून केला. ही थरारक घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. रमेश श्रीराम बनकर (वय ५५) असे मृत भावाचे नाव असून, हत्या करणारा मोठा भाऊ जगन श्रीराम बनकर (वय ६०) याला भिसी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जगन, रमेश आणि त्यांचा दिव्यांग भाऊ किशोर हे तिघे एकत्र राहत होते. रक्षाबंधनानिमित्त बहीण घरी आल्याने तिच्या स्वागतासाठी मटणाचा बेत आखण्यात आला होता. बहीण राखी बांधून परतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास उरलेल्या मटणाच्या भाजीवरून जगन आणि रमेश यांच्यात वादाची ठिणगी पडली. दोघेही दारूच्या नशेत धुंद असल्याने वाद विकोपाला गेला.
रागाच्या भरात जगनने घरात असलेली कुऱ्हाड उपसली आणि रमेश यांच्या मानेवर व डोक्यावर प्राणघातक प्रहार केले. कुऱ्हाडीचे खोल वार बसल्याने रमेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताने माखलेला मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी जगन बनकर याला भिसी पोलिस व शंकरपूर चौकी पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
