OBC Andolan: चंद्रपुरात ओबीसींचा एल्गार! ओबीसींच्या स्वतंत्र कॉलमच्या मागणीसाठी सत्याग्रह आंदोलन

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
आगामी जनगणना २०२७ मध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम असावा आणि जातनिहाय जनगणना तात्काळ करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज चंद्रपुरात गांधी जयंतीच्या निमित्ताने शांततामय सत्याग्रह आंदोलन पार पडले. सकल ओबीसी महामोर्चा आणि ओबीसी सेवा संघाच्या वतीने आयोजित या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच आगामी नोव्हेंबर महिन्यात राजधानी दिल्लीत धडक देण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपुरातील गांधी चौकात ओबीसी बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. ओबीसी नेते अनिल डहाके यांच्या नेतृत्वात हे शांततामय सत्याग्रह आंदोलन पार पडले. जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय (OBC) समाजाला डावलले जात असल्याचा आरोप या वेळी आंदोलनकर्त्यांनी केला.


जनगणनेच्या प्रश्नावलीमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना (कॉलम) असलाच पाहिजे, अशी ठाम भूमिका या वेळी मांडण्यात आली. जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही, असा सूर आंदोलकांनी लावला. चंद्रपुरातील या आंदोलनानंतर आता हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आगामी नोव्हेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे मोठे आंदोलन छेडण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.