घाटकुळ येथील पंपिंग केंद्रावरील नवीन मोटारपंप, पॅनल व साहित्य पुरविण्याचे आणि बसविण्याचे काम अकोला येथील आर्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कंपनीला देण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांतच तिन्ही पंप बंद पडल्याने ९० लाख रुपयांचा खर्च नेमका कोणत्या कामासाठी झाला, असा सवाल उपस्थित होत आहे.
एका मोटारपंपात विद्युत बिघाडामुळे शॉर्टसर्किट झाले, दुसऱ्या पंपाच्या पॅनलमध्ये बिघाड झाला, तर तिसऱ्या पंपाच्या चेकव्हॉल्व्हचे बोल्ट आणि बेअरिंगमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. कमी व्होल्टेज, विद्युत समस्या आणि नेटवर्कमधील अडथळ्यांमुळेही पाणीपुरवठा यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम होत आहे.
पोंभुर्ण्यात महिन्या-पंधरा दिवसांनी मोटारपंप, विद्युत यंत्रणा किंवा पाइपलाइनच्या बिघाडामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रकार घडत आहेत. शहरात आधीच एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना वारंवार खंड पडत असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अवघ्या पंधरवड्यापूर्वीही विद्युत बिघाड आणि नेटवर्कच्या समस्येमुळे सात दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यानंतरही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
वारंवार उद्भवणाऱ्या या समस्यांची जबाबदारी केवळ तांत्रिक बिघाडावर ढकलून चालणार नाही. नवीन यंत्रणेची गुणवत्ता तपासणे, आवश्यक देखभाल करणे, दोष तातडीने दूर करणे आणि पर्यायी व्यवस्था कार्यान्वित ठेवणे ही नगरपंचायतीची जबाबदारी आहे. बाहेरील तज्ज्ञांकडून पाहणी होऊनही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. ९० लाख रुपये खर्चूनही नागरिकांना सहा-सहा दिवस पाण्याविना राहावे लागत असेल, तर या खर्चाचा उपयोग काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
सर्वसाधारण सभांमध्ये वारंवार पाणीप्रश्न मांडूनही प्रशासनाला जाग येत नाही, हे दुर्दैवी आहे. ९० लाख रुपये खर्चून नवीन मोटारपंप बसवूनही नागरिकांना सहा-सहा दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागत असेल, तर हा कसला विकास? सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या गप्पा थांबवून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा. नागरिकांना नियमित पाणी मिळेल, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.आशिष कावटवारविरोधी पक्षनेता, नगरपंचायत, पोंभुर्णा

