महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनवा.

Bhairav Diwase
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी सावली तर्फे मुख्यमंत्री यांना निवेदन.
Bhairav Diwase. Oct 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही सुरूच आहे. भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडित महिलांच्या कुटुंबीयांना, स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना सदर घटनांबद्दल निवेदन पाठविले. सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधा विधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाईदेखील मुख्यमंत्र्यांनी दाखविली नाही. यावरून हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते. या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासनदेखील महिला अत्याचारांच्या सदर घटनांना गांभीर्याने घेत नाही. वरील प्रमाणे सर्व वस्तुस्थिती असल्यामुळे भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे दिनांक २२ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्रामधील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर्स व हॉस्पिटल्स मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एक दिवसीय आंदोलनही करण्यात आले होते. परंतु तरीही असंवेदनशील महाविकास आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे दिनांक १२/१०/२०२० रोजी भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तीत राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे; तरी महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनविण्यात यावेत. व महिलांना सुरक्षितता देण्यात यावी. याकरीता निवेदन तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.तसेच सावली येथील पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयात देण्यात आले आहे.
    यावेळी भाजपा सावली शहर अध्यक्षा मानसी लाटेलवार, भाजपा महिला अध्यक्ष पुष्पाताई शेरकी, जि प सदस्य योगिताताई डबले, शोभाताई बाबनवाडे उपसरपंच व्याहाड, प स माजी सभापती छायाताई शेंडे, महिला उपाध्यक्ष प्रतिभाताई बोबाटे, वैशालीताई कुकडे, विद्याताई कवठे, महिला आघाडी अध्यक्ष पुष्पाताई शेरकी, छायाताई चकबंडलवार, पोर्णिमा गोलकोंडावार व आदी असंख्य महिला उपस्थित होत्या.