Top News

लग्न समारंभादरम्यान फ्रिस्टाईल हाणामारी; पाहुण्यांनी एकमेकांना धू धू धुतलं.


Bhairav Diwase. May 16, 2021

पालघर:- विरार पूर्वेतील सकवार पाटीलपाडा येथे हळदी समारंभात नाचताना दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोनाकाळात लग्नसमारंभ साजरे करण्यावर सरकारने निर्बंध घातलेले असतानाही नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विरार पूर्वेतील सकवार गावच्या पाटीलपाडा येथे तुंबडा कुटुंबीयांतील सुनील तुंबडा याचे लग्नकार्य रविवारी १६ मे रोजी होते. लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा समारंभ ठेवण्यात आला होता. या हळदीच्या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने पाहुणे मंडळींनी गर्दी केली होती. यावेळी हळदीत उपस्थित असलेले नागरिक नाचत होते. नाचताना काही जण मद्यधुंद स्थितीत होते. मध्यरात्री नंतर नाचणाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि याचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं.
अनेक जण एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. तर काही जण एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत होते. जे मिळेल ते एकमेकांवर फेकून मारहाण केली जात होती. काहींनी खुर्च्या उचलून फेकल्या. या हाणामारीत जखमी झालेल्यांची आकडेवारी अजून समोर आली नाही.
दरम्यान हाणामारीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. कोरोनामुळे शासनाच्या नियमानुसार लग्नकार्यास २५ जणांची उपस्थिती व २ तासांची वेळ ठरविण्यात आली आहे. परंतु या घटनेमुळे शासनाचे नियम अक्षरशः पायदळी तुडविण्यात आल्याचे चित्र दिसून आले आहे. मोजक्याच लोकांची परवानगी असताना इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित झालेच कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता यावर प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने