(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
मारेगाव : वेगाव-बोटोणी गटाचे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल जनार्दन देरकर यांच्यावर शुक्रवारी सकाळी वेगाव येथे एका युवकाने दगडाने जबर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहे. पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी हल्लेखोराला तत्काळ अडविल्याने मोठा अनर्थ टळला. हल्लेखोर युवक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.
सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी सकाळी अनिल देरकर हे त्यांचे मावसभाऊ मंगेश भाऊराव सूर यांच्याकडे दिवाळीनिमित्त फराळासाठी गेले होते. फराळ केल्यानंतर काही लोकांसोबत ते घराकडे जाण्यासाठी निघाले असता, त्या परिसरात दबा धरून असलेल्या राहुलने अचानक एक मोठा दगड काही कळायच्या आत अनिल देरकर यांच्या डोक्यात घातला. लगेच त्याने दुसराही दगड देरकरांकडे भिरकावला. तो दगड देरकर यांच्या पायाला लागला. हल्लेखोर पुन्हा दगड मारण्याच्या तयारीत असताना घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी पुढे येऊन आरोपीला अटकाव करून पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने घटनास्थळावरून पळ काढला.
यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले अनिल कळसकर, किसन डोये, मंगेश सूर यांनी जखमी अनिल देरकर यांना तत्काळ मारेगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात अनिल देरकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सात टाके लावण्यात आले आहेत. त्यांच्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. मारेगाव येथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी उशिरा मारेगाव पोलिसांनी आरोपी राहुल जनार्दन सूर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. मात्र आरोपी अद्याप फरार आहे.#attack