Top News

असंवादाची अग्नि विझवण्याचे काम पत्रकारांचे प्रकाश एदलाबादकर यांचा सल्ला #Chandrapur

चंद्रपुर:- पत्रकारितेचे अधिष्ठान संवाद आहे. पण आज समाजात संवाद शिल्लक नसताना, एक पत्रकार म्हणून आपण याबाबत किती लिहितो, बोलतो हा गहन प्रश्‍न आहे. असंवादाच्या अग्नित राजकारणी तेल ओतत असताना, ती आग विझवण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे हे समजून घेतले पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक प्रकाश एदलाबादकर यांनी उपस्थित पत्रकारांना दिला.
विश्‍व संवाद केंद्राद्वारे चंद्रपुरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या सभागृहात मंगळवार, 24 मे रोजी सायंकाळी आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश एदलाबादकर यांची उपस्थिती होती. तर मंचावर लेखक व कथाकार मो. बा. देशपांडे, विश्‍व संवाद केंद्राचे राजेश जोशी, रा. स्व. संघाचे जिल्हा प्रचार प्रमुख कपीश उसगावकर प्रभृती उपस्थित होते.
देवर्षी नारद यांच्या भूमिकेचे सकारात्मक परिणाम मांडताना, त्यांना कळलाव्या म्हणणे योग्य नसल्याचे एदलाबादकर म्हणाले. रामायण काय करावे हे सांगते, तर काय करू नये हे महाभारत शिकवते. देवर्षी या दोघांमधला लंबक आहे. सकारात्मकतेचे सेतूबंध नारदांनी बांधले. पत्रकार हा समाज व शासनामधला सेतू आहे. दोन्ही टोकं जोडून ठेवणे हे पत्रकारितेचे कर्तव्य आहे. वर्तमानपत्राचे धोरण हे संपादकीय पानावरच दिसले पाहिजे. बातम्या या सार्‍याच वर्तमानपत्रांतून समानतेच्या याव्या. मनोरंजन आणि उद्बोधन हे समाजाच्या सुधारणेसाठी आहे. नकारात्मक बोलणे, लिहिणे सोपे असते. पण सकारात्मक लिहिणे, बोलणे कठीण आहे. शब्दांचे तारतम्य ठेवावे लागते. भाषेवर नियंत्रण मिळवावे लागते, असेही एदलाबादकर यांनी यावेळी सांगितले.
मो. बा. म्हणाले, सकृतदर्शनी पत्रकार हा एका पक्षाचा नसतो आणि हीच पत्रकाराची महत्त्वाची भूमिका नारद यांच्यामध्ये दिसते. त्यांची भूमिका नेहमी समन्वयाची राहिली आहे. त्यांना कळीचा नारद म्हणणे हा देवर्षींचा उपमर्दच आहे. ते कीर्तन परंपरेचे पायिक आहेत. खरे तर, ‘सप्त चिरंजीवी’च्या मांदियाळीत त्यांना आठवा चिरंजीव म्हणायला हवे. कारण नारद यांची भूमिका आजही सर्वत्र आणि सर्वदा दिसते.
राजेश जोशी यांनी प्रास्ताविकातून विश्‍व संवाद केंद्राची माहिती दिली. जनसंवाद हे मुळे भारताचे शास्त्र असून, देवर्षी नारद त्याचे प्रणेते असल्याचे ते म्हणाले. यावेळी ‘चंद्रपूर समाचार’चे संपादक चंद्रगुप्त रायपुरे, ‘महाविदर्भ’च्या संपादक कल्पना पलिकुंडवार यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तीने मनोगत व्यक्त केले.डॉ.हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चे अध्यक्ष वसंतराव थोटे, रा.स्व. संघाचे विभाग कार्यवाह दत्ताजी बहादूरे, डॉ.शरदचंद्र सालफळे, भारतीय सद् विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप पोशेट्टीवार, हे उपस्थित होते. संचालन निखील शितुत यांनी केले. तर आभार वैभव थोटे यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने