Top News

चंद्रपूर जि.प. तर्फे १६ शिक्षकांना शिक्षक पुरस्कार प्रदान #chandrapur



चंद्रपूर:- शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेतर्फे १५ प्राथमिक तर एक माध्यमिक अशा एकूण १६ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, गावातील सर्वात विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हणून शिक्षकाकडे पाहिले जाते. शिक्षक चांगला तर तो समाज चांगला असे समीकरणच आहे. कोणताही पाल्य हा पालकांसोबत कमी तर शिक्षकांसोबत जास्त वेळ असतो. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे. शिक्षकांना ज्ञानार्जनाव्यतिरिक्त शासनाची जवळपास १५० कामे अधिकची करावी लागतात. ही अतिशयोक्ती आहे. शैक्षणिक बाबतीत चंद्रपूर जिल्हा हा राज्यात अव्वल ठेवण्यासाठी शिक्षकांनी तसेच अधिका-यांनी प्रयत्न करावे. तसेच संस्कारी विद्यार्थी शिक्षकांच्या हातून घडावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना गौरकार म्हणाल्या की, जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे जवळपास पाच हजार शिक्षक आहेत. प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी किमान एक विद्यार्थी घडविला तरी जिल्ह्यात पाच हजार विद्यार्थी दरवर्षी घडू शकतात. ग्रामीण भागातील शिक्षकांची पालक म्हणूनही जबाबदारी असते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी सुरू केलेल्या मिशन गरुडझेपमध्ये सर्व शिक्षकांचे चांगले सहकार्य मिळत आहे, असे त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकातून शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे म्हणाले, जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हाभरातून ३१ अर्ज प्राप्त झाले. शासन निर्णयानुसार एका तालुक्यातून एक असे एकूण १५ प्राथमिक तर माध्यमिक विभागातून १ अशा एकूण १६ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शासन निर्णयात असलेल्या निकषांची अतिशय काटेकोरपणे तपासणी करून जिल्हा शिक्षक पुरस्कार निवड समितीद्वारे १६ नावे निश्चित केली गेली. तसेच या यादीला विभागीय आयुक्तांची मान्यता मिळाली, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षक :

संजय कान्हुजी (सोनेगाव वन, ता. चिमूर), राहुल कळंबे (कोटगाव, ता.नागभिड), विनोद लांडगे (पेंढरी (कोके) ता. सिंदेवाही), वामन चौधरी (साखरी, ता.सावली), काकासाहेब नागरे (वडगाव, ता.कोरपना), मेघा शेंडे (देऊळवाडा, ता.भद्रावती), प्रितिबाला जगताप (बामणी (दु.) ता.बल्लारपूर), करुणा गावंडे (आर्वी, ता.राजुरा), नामदेव अस्वले (चिंचाळा, ता.चंद्रपूर), सुशीला पुरेड्डीवार (आक्सापूर, ता.गोंडपिपरी), सुचिता जिरकुंटवार (चेकखापरी, ता.पोंभूर्णा), उमाजी कोडापे (पल्लेझरी, ता.जिवती), दिलीप बावनकर (एकारा, ता.ब्रह्मपुरी), सुंदर मंगर (कवडपेठ, ता.मुल), संजू जांभुळे (खेमजई, ता.वरोरा) व विनोद कोवे (गुंजेवाही, ता.सिंदेवाही) या शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने