अंत्यसंस्कारासाठी गेला अन् नदीत बुडून मेला #death #kurkheda

Bhairav Diwase

एकाला वाचविण्यात दुसऱ्याचा गेला जीव
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
कुरखेडा:- एका महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी मित्रांसमवेत नदीवर गेलेला युवक अन्य एका मित्रासह बंधाऱ्यावरून घाटावर येण्याचा प्रयत्न करताना बुडाला. दाेघेही खाेल पाण्यात बुडत असताना एकाला वाचविण्यात यश आले; परंतु दुसऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना कुरखेडा येथील सती नदी घाटावर शुक्रवार १६ सप्टेंबर राेजी दुपारी १ वाजता घडली.
चेतन मधुकर सलामे (२२) रा. मोहगाव (वाकडी) असे मृृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. कुरखेडा शहरातील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने त्या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी चेतन आपल्या मित्रांसह सती नदी घाटावर गेला होता. अंत्यसंस्कार पार पाडल्यानंतर पाच-सहा मित्र नदी पुलावरून परत न येता नदी पात्रात असलेल्या बंधाऱ्यावरून येण्याचा प्रयत्न करीत हाेते. सदर बंधाऱ्यावरून पाणी वाहत हाेते. दरम्यान पाय घसरून बंधाऱ्याजवळील खोल खड्ड्यातील पाण्यात एक युवक बुडू लागला.
त्याला वाचविण्यासाठी चेतन सलामे पाण्यात उतरला. त्या युवकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चेतनसुद्धा बुडू लागला. यावेळी इतर युवकांनी हातांची साखळी तयार करून पहिल्या युवकाला पाण्यातून बाहेर काढले. त्याचा जीव वाचला; मात्र चेतनला वाचविण्यासाठी थाेडा उशिर झाल्याने ताे पाण्यात बुडाला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेबाबत कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला.