Top News

मोठी बातमी! चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmineमुंबई:- महाराष्ट्राच्या भूर्गाभात कोळसा, बॉक्साईट, आयर्न यासारख्या खनिजांबरोबरच सोनेही दडले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात भूर्गभात सोन्याचे दोन ब्लॉक (खाणी) आढळून आल्या आहेत.

या भागात भूर्गाभात तांबेही असून या भागातून सोनेही मोठ्या प्रमाणात मिळू शकते, असा केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याची माहिती राज्याच्या खनिकर्म विभागातील सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे कोकणातीलत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही भूगर्भात सोने असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली असल्याची माहितीही मिळाली आहे.

राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचा ओझरता उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ताज हॉटेलमधील खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेत केला होता. राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या परिषदेला केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृत लाल मीना आदी उपस्थित होते.

राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी आपल्याला दिली आहे. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने