मुलांसह आत्महत्येसाठी आई गेली विहिरीवर #chandrapur #saoli

Bhairav Diwase

मुलगा हात झटकून पळाला, मायलेकीचा मृत्यू
सावली:- मुला-मुलीला घेऊन आईने विहीर गाठली. मुलाला शंका आली. त्याने आईचा हात झटकून तिथून पळ काढला. मात्र मुलीला घेऊन आईने विहिरीत उडी घेतली. या घटनेत माय-लेकीचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस येताच चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील खेडी या गावात ही घटना संध्याकाळी पाच वाजताचा सुमारास उघळकीस आली.


दर्शना दीपक पेटकर (35), समीक्षा दीपक पेटकर (14) अशी मृत माय-लेकीची नावे आहेत. मूल शहरातील दीपक पेटकर यांची खेडी शिवारात शेती आहे. पत्नी दर्शना, मुलगी समीक्षा व मुलगा सोहन हे शेतात गेले होते. आई दर्शनाने दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास स्वत:च्या शेताला लागूनच असलेल्या शेतकऱ्याच्या विहिरीत मुलगी समीक्षा हिला ढकलं. मुलगा सोहन याचा हात पकडून विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोहनने हात झटकून तिथून खेडी गावात पळ काढला.


मुलगा गावात गेल्याचे पाहून आई दर्शनानेही त्याच विहिरीत उडी घेतली. यात माय-लेकीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार जीवन राजगुरु,हवालदार मोहुर्ले, पोलीस कर्मचारी कपिल भंडारवार यांनी घटनास्थळ गाठले. दोघांचाही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.