Top News

काँग्रेसच्या बड्या नेत्याची मुलगी लोकसभेच्या रिंगणात? #Chandrapur


शिवानी वडेट्टीवारांनी पक्षाकडे मागितलं तिकीट

चंद्रपूर:- चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला होता. मात्र मागील वर्षी त्यांचं निधन झालं. तेव्हापासून ही जागा रिक्त होती. याच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. या मतदारसंघातून आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याचंही शिवानी वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.


शिवानी वडेट्टीवार यांनी आपल्या एक्स हँडलवर याबाबतची पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "गेल्या सात वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करत असताना खरं तर मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करायची होती. मात्र लोकशाही संपवू पाहणाऱ्या या सरकारने जिल्हा परिषद निवडणुकाच घेतल्या नाही. त्यामुळे आता संसदेतूनच आवाज उठवणार," असा निर्धार शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.


काँग्रेसच्या तिकिटाबाबत बोलताना शिवानी यांनी म्हटलं आहे की, "लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी या संघर्ष करत असताना मी देखील त्यात खारीचा वाटा उचलत आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन, मोर्चे काढून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न केला. कामगार, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींसाठी आवाज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. विविध स्पर्धा आणि उपक्रमाच्या माध्यमातून युवा वर्गाला पक्षाशी जोडले. संसदेत काँग्रेस पक्षाचा आवाज मजबूत करण्यासाठीच ज्येष्ठांपासून ते नवमतदारांचा मला उमेदवारी करण्यासाठी आग्रह आहे. म्हणूनच पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी देण्याचा अधिकार सर्वस्वी पक्षाकडे असून त्यांचा निर्णय मला मान्य असेल," असं शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी व काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यादेखील इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसकडून नक्की कोणाला तिकीट दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने