रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार #Chandrapurpolice#chandrapur

Bhairav Diwase


पोलीस प्रशासनात खळबळ



चंद्रपूर:- खूनाच्या आरोपातील पतीला वाचविण्याचे आमिष दाखवून चंद्रपूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार याने एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार याला अटकही करण्यात आली आहे.


Also Read:- PM NARENDRA MODI: पंतप्रधान नरेंद्र मोदी "या" तारखेला चंद्रपूरात


चंद्रपूर शहरात पीडित महिलेचे वास्तव्य आहे. तिचा पती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याविरुद्ध अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. एका खूनाच्या प्रकरणात तो कारावासही भोगत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे जामिनावर बाहेर आहे.



स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस कर्मचारी संजय आकुलवार याला खूनाच्या आरोपातील आरोपी जामिनावर बाहेर असल्याची भनक लागल्याने त्याने पीडित महिलेच्या घरी येणे-जाणे सुरू करून तिला आमिष दाखवू लागला. पतीला खुनाच्या आरोपातून वाचवायचे असेल तर माझ्या मनाप्रमाणे कर, अशी धमकीच संजय आकुलवार याने दिल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.



अनेक दिवसांपासून आरोपी पीडित महिलेचे शारीरिक शोषण करीत राहिला. अनेकदा मद्यप्राशन करून घरी येणे, असे प्रकार सुरू झाले. त्यामुळे परिसरात पीडित महिलेची बदनामीही सुरू झाली. या सर्व गोष्टीला कंटाळलेल्या पीडितेने मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून संजय आकुलवार विरुद्ध कलम ३७६, ३५४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याला बुधवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारीच हैवान निघाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.