बाबा आमटेंच्या आनंदवनात धारदार शस्त्राने महिलेची हत्या #murder #chandrapur #warora

Bhairav Diwase

वरोरा:- अंध वडिलांना घेऊन आई सेवाग्राम येथे उपचारासाठी गेल्याने विवाहित महिला वडिलांच्या घरी एकटी होती. यादरम्यान अज्ञात आरोपीने शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची घटना बुधवार २६ जूनच्या रात्री घडली.


मृत महिलेचे नाव आरती दिगंबर चंद्रवंशी (२४) असे आहे. श्रद्धेय बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आरती हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. परंतु काही दिवसांपासून ती आपल्या आई -वडिलांकडे वास्तव्याला होती. घटनेच्या दिवशी बुधवार २६ जून रोजी महिलेचे वडील आपल्या पत्नीसोबत सेवाग्राम येथे उपचारार्थ गेले होते. जेव्हा रात्री आई -वडील घरी पोहोचले तेव्हा मुलीचे शव बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. मृतक महिलेच्या गळ्यावर शस्त्राचे वार दिसून आले. घटनास्थळी रक्त साचले होते. पोलीस विभागाला माहिती कळविण्यात आली. लागलीच पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे घटनास्थळी दाखल झाले. घटनेची पुढील चौकशी सुरु केली.