गडचिरोली:- राज्य सरकार आणि सत्तेतील प्रमुख नेत्यांवर कुणी बिनबुडाचे आरोप करीत असतील तर मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांची ईडीमार्फत चौकशी करायला लावू, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी खासदार अशोक नेते यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता दिला.
ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा विधान सभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित जिंदाल स्टील उद्योग शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी कवडीमोल दराने अधिग्रहीत करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप केला होता. शिवाय, लीजची मुदत संपल्यानंतरही संबंधित खाणपट्ट्याचा खुला लिलाव न करता सरकारने जिंदाल समुहाला जुन्याच रॉयल्टीने लीज दिली. यातून सरकारमधील तिन्ही पक्षांना दरमहा प्रत्येकी ५०० कोटी मिळणार, असाही गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी माजी खासदार अशोक नेते यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
अशोक नेते म्हणाले की, भाजप सरकारने भूमी अधिग्रहण कायदा आणला. नव्या कायद्यानुसार, एखाद्या प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहण करायची असल्यास संबंधित शेतकऱ्यांना चारपट मोबदला देण्यात येतो. त्यामुळे कवडीमोल दराने जमिनी अधिग्रहण करणार असल्याचा काँग्रेस नेत्यांचा आरोप बिनबुडाचा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस नेते शेतकऱ्यांना भडकावत असल्याचे सांगून अशोक नेते यांनी हा खटाटोप वसुलीसाठी असल्याची शंका व्यक्त केली. आरोप करणाऱ्या नेत्यांचे हात भ्रष्टाचाराने माखलेले आहेत. ते बिनबुडाचे आरोप करीत असतील तर त्यांची ईडीची चौकशी सुरु करु, असा इशारा माजी खासदार नेते यांनी वडेट्टीवारांचे नाव न घेता दिला.
पत्रकार परिषदेला आ.डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सहसंपर्कप्रमुख हेमंत जंबेवार, भाजप नेते बाबूराव कोहळे उपस्थित होते.