जळगाव:- जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चाळीसगाव शहरातील खंडणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या अजय पाटील या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले. तसेच संबंधित ठाण्याचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची नियंत्रण कक्षात तातडीने बदली केली आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी सोमवारी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून एका व्यावसायिकाकडून एक लाख २० हजाराची खंडणी उकळणाऱ्या पोलिसावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. इतकेच नव्हे तर, पोलीस ठाण्याच्या शेजारीच काही अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
सुरुवातीला पोलीस अधिकारी दोषी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. परंतु, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातच ठिय्या देणार असल्याचा पवित्रा आमदार चव्हाण यांनी घेतला. त्यानंतर अजय पाटील या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला. दरम्यान, आमदार चव्हाण यांनी चाळीसगावमध्ये घडलेला प्रकार राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कानावर घातला.
डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश दिले असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सामान्य नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीही स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलीस उपनिरीक्षकास अमली पदार्थ प्रकरणातील संशयिताशी लागेबांधे ठेवल्याच्या कारणावरून निलंबित केले होते. याशिवाय, दोन पोलीस कर्मचाऱ्यांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली होती.