चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील रहमत नगर परिसरात आज एक मोठी दुर्घटना टळली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पाणी शुद्धीकरण केंद्रावर क्लोरिन गॅसची गळती झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रशासनाच्या आणि आपत्कालीन यंत्रणांच्या तत्परतेमुळे परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, फायर कंट्रोल रूमला रहमत नगर येथील पाणी शुद्धीकरण केंद्रातून क्लोरीन गॅस लीक झाल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच, महानगरपालिकेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
गॅस गळतीमुळे परिसरातील नागरिकांना कोणताही धोका होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास 60 ते 70 घरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. त्यांना किडवाई शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्राप्त माहितीनुसार, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे काही काळासाठी परिसरात तणाव होता, परंतु परिस्थिती नियंत्रणात आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.